पेन्शन कार्डच्या नावाखाली वृद्धाची १ लाख ६९ हजारांची फसवणूक; रत्नागिरीत खळबळ

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:
पेन्शन कार्डच्या कामाचे आमिष दाखवून एका अज्ञात भामट्याने ८३ वर्षीय वृद्धाची १ लाख ६८ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ९ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० ते ३ या वेळेत शहरातील टिळक आळी परिसरात घडली आहे.

फिर्यादी कौस्तुभ श्रीनिवास गोरे (वय ४३, रा. टिळक आळी, रत्नागिरी) यांचे वडील घरी असताना, एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन केला. संशयिताने पेन्शन कार्डबद्दल माहिती देण्याच्या बहाण्याने वृद्धाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, संशयिताने व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून त्याद्वारे वृद्धाच्या मोबाईलचा ताबा (ॲक्सेस) मिळवला. या लिंकचा वापर करून भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ६८ हजार ५०० रुपये परस्पर वळवून फसवणूक केली.

फिर्यादींचे वडील ८३ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असल्याने, सुरुवातीला कौस्तुभ गोरे यांनी सायबर पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवली होती. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जाऊन सविस्तर तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
      अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *