रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
शासकीय कार्यालये केवळ चकचकीत आणि टोलेजंग इमारती उभारून चालणार नाहीत, तर त्या इमारतींमधून सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागली पाहिजेत, असे महत्त्वाचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
तालुक्यातील नाखरे गावातील विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात आणि गेल्या पाच वर्षांत मार्गी लागलेल्या कामांच्या अहवाल प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी सामंत यांच्या हस्ते विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
या सोहळ्याला शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. महेंद्र मांडवकर, पंचायत समिती रत्नागिरी सदस्य नेताजी पाटील, नामदेव कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. नाखरेचे माजी सरपंच विजय चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या लोकउपयोगी कामांचा आणि कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा अहवाल पाहून सामंत यांनी त्यांचे कौतुक केले. असा आढावा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.
भावी पिढी सुसंस्कृत घडवण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. “आपण स्वतः मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनही आयुष्यात कोणतीही अडचण आली नाही,” असे सांगत, पालकमंत्री उदय सामंत यांनी पालकांना आपल्या पाल्यांना मराठी शाळेतच पाठवण्याचे कळकळीचे आवाहन केले.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुहास वाडेकर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख रामदास लांजेकर, केदार पावसकर, संजय मांडवकर यांच्यासह महिला आणि युवा वर्गाचे मोठे योगदान लाभले.
शासकीय कार्यालये फक्त चकचकीत इमारतींसाठी नसावीत, तर नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी हवीत – पालकमंत्री उदय सामंत
Leave a Comment
