सावंतवाडी:
बुधवारी सकाळपासूनच सावंतवाडी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, या पावसाचा फटका माठेवाडा परिसराला बसला आहे. आत्मेश्वर मंदिर मागील डॉक्टर साईल यांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. या पुरात ८१ वर्षांचे वृद्ध चंद्रकांत आकेरकर हे घरातच अडकले होते.
नेमकं काय घडलं?
संस्थानकालीन मोरी (पाण्याचा निचरा होणारा मार्ग) ब्लॉक झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट घरामध्ये शिरले. याच कारणामुळे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
नगराध्यक्षांकडून तत्काळ मदत
ही माहिती मिळताच सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच, मोरीचे काम तातडीने करून पाणी निचरा करण्याचे आदेश दिले. पावसाचा जोर ओसरल्यानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असून, नगराध्यक्षांच्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
सावंतवाडीत पावसाचा कहर; घरात अडकलेल्या वृद्धाच्या मदतीला धावल्या नगराध्यक्षा
Leave a Comment
