१ जूनपासून कोकण किनारपट्टीवर मासेमारी बंदी! नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी (प्रतिनिधी):
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२६ या ६१ दिवसांच्या कालावधीसाठी महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलधी क्षेत्रात यांत्रिक आणि यंत्रचलित नौकांना मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व मच्छिमारांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त (तांत्रिक) सा.वि. कुवेसकर यांनी केले आहे.

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक आणि यंत्रचलित नौका १ जून २०२६ पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे.ही पावसाळी मासेमारी बंदी केवळ यांत्रिक नौकांना लागू राहील. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (१२ सागरी मैलांपुढे) खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांवर केंद्र शासनाचे धोरण आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

बंदीच्या काळात सागरी कायद्याचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्यांवर अतिशय कठोर कायदेशीर पावले उचलली जातील. १२ सागरी मैलांच्या आत बेकायदेशीर मासेमारी करताना आढळल्यास, सुधारित अधिनियम २०२१ च्या कलम १४ अन्वये संबंधित नौका, त्यावरील उपकरणे आणि पकडलेली मासे जप्त करण्यात येतील.कलम १७ मधील तरतुदींनुसार दोषींवर जास्तीत जास्त कठोर आर्थिक व कायदेशीर शास्ती लादण्यात येईल.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बंदीच्या काळात समुद्रात गेल्यास आणि काही अपघात झाल्यास, अशा नौकेला शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा नुकसान भरपाई दिली जाणार नाही.
       सर्व मच्छिमार सहकारी संस्था, नौका मालक आणि सदस्यांनी या शासकीय आदेशाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि बंदीच्या काळात समुद्रात नौका नेणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *