रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील चर्मालय ते कोकणनगर या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील प्रलंबित अतिक्रमणे हटवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे वारंवार सूचना देऊनही अनधिकृत बांधकामे न हटवल्याने, येत्या शुक्रवारपासून (६ मार्च) या मार्गावरील बेकायदेशीर गाळे आणि बांधकामांवर पालिकेचा हातोडा चालणार आहे.
रत्नागिरी विमानतळ विस्तार आणि रस्ते रुंदीकरणाच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत कळीचा मानला जातो. या मार्गावरून विमानतळासाठी ११ केव्हीची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत बांधकामांनी या विकासकामात मोठा अडथळा निर्माण केला आहे.
फेब्रुवारी महिन्यात नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानतळ विकास प्राधिकरण यांनी संयुक्त मोहीम राबवून २५ ते ३० टक्के अतिक्रमण हटवले होते. त्यावेळी काही गाळेधारकांनी “आम्ही स्वतःहून बांधकामे काढून घेऊ,” अशी विनंती केल्याने प्रशासनाने माणुसकीच्या नात्याने ही मोहीम तात्पुरती स्थगित केली होती.मात्र, दिलेली एक महिन्याची मुदत संपूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने महावितरणला आपले काम करणे अशक्य झाले आहे. प्रशासनाने आता शेवटची नोटीस बजावली असून, दोन दिवसांत बांधकामे न हटवल्यास ती जमीनदोस्त करण्याचा इशारा दिला आहे.
६ मार्च रोजी सकाळी सुरू होणाऱ्या या मोहिमेसाठी पालिकेने पोलीस प्रशासनाकडे कडक बंदोबस्ताची मागणी केली आहे. चर्मालय ते कोकणनगर दरम्यानचा संपूर्ण मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
रत्नागिरीत पालिकेचा ‘हातोडा’ पुन्हा गरजणार!
Leave a Comment
