रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याची प्रमुख ओळख असलेल्या प्रसिद्ध ‘रत्नागिरी हापूस’ आंब्याच्या नावाखाली सध्या बाजारात कर्नाटकातून आलेल्या आंब्याची उघडपणे विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरी हापूस समजून पर्यटकांना सर्रासपणे कर्नाटकचा आंबा विकला जात असल्याने पर्यटकांची मोठी फसवणूक होत आहे. या प्रकारामुळे कोकणातील स्थानिक बागायतदार आणि व्यापारी वर्गामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, सध्या बाजारात कर्नाटकी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक रत्नागिरी हापूसवर झाला असून, अस्सल हापूसचे दर कमालीचे कोसळले आहेत. बाजारातील या अनपेक्षित मंदीमुळे जिल्ह्यातील कॅनिंग व्यवसायालाही (आंबा प्रक्रिया उद्योग) मोठा फटका बसला असून व्यावसायिक चिंतेत आहेत.
सध्या मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने कोकणात पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध भागांतून हजारो चाकरमानी व पर्यटक रत्नागिरीत दाखल होत आहेत. कोकणातील नयनरम्य निसर्ग, अथांग समुद्रकिनारे, ताजे मासे आणि ‘रत्नागिरीचा राजा’ म्हणजेच हापूस आंबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.
मात्र, नेमका याच गोष्टीचा गैरफायदा काही व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे. बाहेरून आलेला आंबा रत्नागिरी हापूस म्हणून गळ्यात मारला जात असल्याने ग्राहक आणि पर्यटकांची उघडपणे लूट होत आहे. यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक बागायतदारांमधून जोर धरू लागली आहे.
रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची उघड विक्री; पर्यटकांची फसवणूक, स्थानिक बागायतदार संतप्त!
Leave a Comment
