महाड: माणगाव-रायगड मार्गावर महाड जवळील पुनाडेवाडी गावाजवळ घाटात आज सकाळी एक थरारक अपघात घडला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एक खाजगी बस थेट दरीच्या दिशेने गेली. मात्र, ‘दैव बलवत्तर’ म्हणून बस रस्त्या कडील संरक्षण कठड्यावर (Safety Barrier) जाऊन अडकली. त्यामुळे बस दरीत कोसळण्यापासून बालंबाल वाचली आणि एक मोठी दुर्घटना टळली. आज, २९ मे रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून ‘अक्षरा ट्रॅव्हल्स’ या खाजगी कंपनीची बस पर्यटकांना घेऊन रायगडकडे रवाना झाली होती. माणगाव मार्गे रायगडकडे येत असताना पुनाडेवाडी येथील घाटात एका धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेली बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली.
संरक्षण कठड्यामुळे जीवदान
बसचा पुढील भाग संरक्षण कठड्यावर अत्यंत विचित्र पद्धतीने अडकून पडला. जर तिथे मजबूत कठडा नसता, तर बस थेट खोल दरीत कोसळली असती. मात्र, कठड्याने बसला रोखून धरल्याने बस दरीत कोसळण्यापासून वाचली.
प्रवाशांचा जीव भांड्यात पडला
अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमध्ये एकच एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने सर्वच्या सर्व ४० प्रवासी पूर्णपणे सुखरूप असून, त्यांना सुरक्षितपणे बसच्या बाहेर काढण्यात आले आहे. सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.
