रत्नागिरी येथील आरे समुद्रकिनारी कोल्हापूर येथील सहलीतील दोघे बुडाले, एकाला वाचविले

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी:

कोल्हापूर येथून रत्नागिरीत सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील दोन विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरे समुद्र किनाऱ्यावर घडली. या दुर्घटनेत एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसऱ्या एका विद्यार्थ्याला स्थानिक आणि पोलिसांनी जीवाची बाजी लावत सुखरूप बाहेर काढले आहे.

अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. कोल्हापूर) असे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर मयूर विष्णू खाडे (वय १६, रा. कोल्हापूर) असे वाचवण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​पोहण्याचा मोह नडला, ‘असा’ घडला थरार!

​मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील एका खासगी शिकवणी क्लासेसचे ४१ विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी आले होते. मंगळवारी दुपारी हे सर्व विद्यार्थी समुद्रात आंघोळीचा आनंद घेत होते. दरम्यान, अतुल सुतार हा विद्यार्थी पोहत पोहत समुद्रात पुढे गेला. त्याला माघारी बोलवण्यासाठी त्याचा मित्र मयूर खाडे हा देखील त्याच्या मागोमाग पुढे गेला. मात्र, समुद्रातील पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा (करंट) अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. आपल्या सोबतीला बुडत असल्याचे पाहून किनाऱ्यावरील इतर विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरड सुरू केली.

​पोलीस आणि झीप लाईन कर्मचाऱ्यांचे शौर्य!

​विद्यार्थ्यांचा आक्रोश ऐकून घटनास्थळी तैनात असलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप पाटील आणि तेथील झीप लाईनचे कर्मचारी सुरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर आणि महेश साळवी यांनी कसलाही विचार न करता थेट समुद्रात धाव घेतली. त्यांनी जीवाची बाजी लावत दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले.

दुर्दैवी अंत आणि मदतकार्य:

पाण्यातून बाहेर काढण्यापूर्वीच अतुल सुतार याचा जागीच मृत्यू झाला होता. तर बेशुद्ध अवस्थेतील मयूर खाडे याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील आदेश कदम यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. सध्या मयूरची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, मृत अतुलच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *