राजपुरात संततधार पावसाचा इशारा: तहसीदार कार्यालयाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Shabbir Vasta
1 Min Read

राजापूर: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राजापूर तहसील कार्यालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
     अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे तसेच धरण परिसरातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
      नागरिकांनी नदी, नाले, पूल, धबधबे तसेच पूरग्रस्त भागात जाणे टाळावे. ज्या ठिकाणी पाण्याचा वेग अधिक आहे, अशा ठिकाणी रस्ता किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पसरवू नका.आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक कागदपत्रे, औषधे, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. वीजेच्या तारा, विद्युत उपकरणे आणि पाण्यातील विद्युत धोक्यांपासून सावध राहावे.
      लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी त्वरित स्थानिक ग्राम प्रशासन, पोलीस, महसूल विभाग किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा. “आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सतर्क राहावे,” असे राजापूर तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *