साळवी स्टॉप डम्पिंग ग्राऊंडचा श्वास कोंडला! वारंवार लागणाऱ्या आगींमुळे रत्नागिरीकरांचे आरोग्य धोक्यात

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:
साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंड सध्या धुराच्या विळख्यात सापडले असून, येथील कचऱ्याला वारंवार लागणाऱ्या आगींमुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा आणि आगीवर नियंत्रण मिळवावे, या मागणीसाठी नगरसेविका सौ. पूजा दीपक पवार यांनी मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

शहराचा कचरा साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी या कचऱ्याला भीषण आगी लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण परिसरात पसरणाऱ्या या धुरामुळे नागरिकांचा श्वास कोंडत आहे. रहिवाशांमध्ये डोळ्यांची जळजळ, घशाचे संक्रमण आणि श्वसनाचे विकार बळावत आहेत.परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत आहे.

नगरसेविकांच्या प्रमुख मागण्या,कचऱ्याला लागणारी आग विझवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. आग लागल्यास ती विझवण्यासाठी घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दल किंवा पाण्याची टँकर उपलब्ध करून द्यावेत. विषारी धुरापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.
     यावेळी विभागप्रमुख दीपक पवार देखील उपस्थित होते. आता या निवेदनानंतर नगरपालिका प्रशासन या ‘धगधगत्या’ प्रश्नावर किती लवकर कृती करते, याकडे सर्व रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *