रत्नागिरी:
आर्थिक वर्षाच्या गडबडीतून मोकळे होताच आता रत्नागिरी नगर परिषद प्लास्टिक प्रदूषणाविरोधात आक्रमक पवित्रा घेणार आहे. शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष मोहीम हाती घेतली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
बाजारपेठेवर असणार प्रशासनाची ‘करडी नजर’
शासकीय स्तरावर सध्या मार्चअखेरच्या कामांची लगबग सुरू आहे. ही कामे पूर्ण होताच प्रशासनाचे संपूर्ण लक्ष प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीकडे वळणार आहे. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या विविध भागात पथकांद्वारे अचानक तपासणी केली जाईल. यात प्रामुख्याने बाजारपेठा, किरकोळ विक्रेते आणि घाऊक व्यापाऱ्यांकडील साठ्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
काय आहे नवीन नियम?
खालील वस्तूंवर पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, त्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक किंवा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल:
* १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या.
* ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक शीट.
* प्लास्टिक व थर्मोकॉलपासून बनवलेल्या थाळ्या, कप, ग्लास, वाट्या, स्ट्रॉ, चमचे आणि सजावटीचे साहित्य.
दंडाचा असा असेल दणका:
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूद अत्यंत कडक करण्यात आली आहे:
१. पहिल्यांदा गुन्हा आढळल्यास: ५ हजार रुपये दंड.
२. दुसऱ्यांदा नियम मोडल्यास: १० हजार रुपये दंड.
३. तिसऱ्या गुन्ह्यासाठी: २५ हजार रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागू शकते.
प्रशासनाने ही मोहीम अत्यंत गांभीर्याने घेतली असून, व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर तात्काळ थांबवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.
