रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ; ५८ हजार बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते बालकाला पोलिओचा डोस पाजून आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. ‘दोन थेंब प्रत्येकवेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हा संदेश देत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील ५८ हजार ८१५ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भारताने २०१४ मध्ये पोलिओमुक्त देशाचे प्रमाणपत्र मिळवले असले तरी, हा स्तर कायम राखण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबवली जात आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यात एक हजार ६५९ बुथ उभारण्यात आले असून, तीन हजार ४७७ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ३४६ पर्यवेक्षकांमार्फत या कामावर देखरेख ठेवली जात असून, दुर्गम भागासाठी १५० मोबाईल टीम्स आणि रेल्वे स्थानके, बस स्थानके व चेक पोस्टसाठी ३४ ट्रान्झिट टीम्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ज्या बालकांना आज बुथवर लस मिळू शकली नाही, त्यांना शोधण्यासाठी पुढील तीन दिवस ग्रामीण भागात आणि पाच दिवस शहरी भागात आरोग्य पथके घरोघरी भेट देणार आहेत. यासाठी चार लाख ३७ हजार ८९१ घरांचे नियोजन करण्यात आले आहे.

देशाचा पोलिओमुक्त दर्जा टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब नक्की पाजावेत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात लस वाहक, बर्फाचे पाकीट आणि शीत साखळी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *