रत्नागिरी:
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतल्याने रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी बाळ माने यांच्यावर अत्यंत सडेतोड आणि आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे.
रणांगणातून पळ काढणाऱ्यांचा बुरखा फाडला
बाळ माने यांच्या या नाट्यमय माघारीवर तीव्र प्रतिक्रिया देताना राहुल पंडित म्हणाले, “आज खरा गद्दार कोण, हे रत्नागिरीकरांना पुरते कळाले आहे.” बाळ माने हे रणांगणातून पळ काढणारे उमेदवार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा थेट टोलाही त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीसह भाजप कार्यकर्त्यांमध्येही तीव्र संताप
अर्ज माघारीच्या दिवशी बाळ माने यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. यावर बोट ठेवत पंडित यांनी गंभीर आरोप केला की, बाळ माने यांनी एका बाजूला उबाठा गटाची अधिकृत उमेदवारी घेतली आणि दुसऱ्या बाजूला पडद्यामागे नितेश राणे यांच्यासोबत ‘सेटिंग’ केले. माने यांच्या या भूमिकेमुळे आज केवळ महाविकास आघाडीच नव्हे, तर भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते देखील प्रचंड नाराज झाले आहेत, असा दावा पंडित यांनी केला आहे.
सामंतांच्या वर्चस्वामुळे मानेंकडे संख्याबळाचा दुष्काळ
महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर प्रकाश टाकताना राहुल पंडित पुढे म्हणाले, “या संपूर्ण प्रक्रियेत नितेश राणे यांनी आपली शक्ती उगाचच फुकट घालवली आहे. मुळात बाळ माने यांच्यासोबत असणारी निम्म्यापेक्षा जास्त मते ही आधीच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या ताब्यात होती. त्यामुळे माने यांच्याकडे कोणतेही मोठे संख्याबळ शिल्लक राहिले नव्हते.”
निश्चित पराभवाच्या धास्तीने अखेर शरणागती
बाळ माने यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंडित यांनी दावा केला की, “बाळ माने यांनी जर आपली उमेदवारी कायम ठेवून ही निवडणूक लढवली असती, तर त्यांना संपूर्ण कोकण मतदारसंघातून केवळ १० ते १२ मते पडली असती, ही वस्तुस्थिती आहे. आपली ही नामुष्की आणि दारूण पराभव समोर स्पष्ट दिसू लागल्यामुळेच बाळ माने घाबरले आणि त्यांनी रणांगणातून पळ काढत उमेदवारी अर्ज मागे घेतला.”
बाळ माने यांच्या या अनपेक्षित माघारीमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात आता नवा वाद पेटला असून आगामी काळात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
