रत्नागिरी: सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांचा एकमेव आधार असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुरवस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील भोंगळ कारभार, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि सुविधांचा अभाव याविरोधात मनसेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे धारेवर धरले.
प्रमुख मागण्या आणि निवेदातील मुद्दे:
रुग्णालयातील दुरवस्थेचा पाढा वाचताना मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांनी प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले. निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
* तज्ज्ञ डॉक्टरांची तातडीने भरती: हृदयविकार, कॅन्सर आणि मेंदूविकार यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि अत्याधुनिक औषधोपचारांची उपलब्धता तत्काळ करण्यात यावी.
* जनसंपर्क कक्षाची स्थापना: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती मिळत नाही. यासाठी स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी नेमून माहिती कक्ष सुरू करावा.
* स्वस्त रुग्णवाहिका सेवा: रुग्णांसाठी रुग्णालयाची स्वतःची रुग्णवाहिका नाममात्र दरात चोवीस तास उपलब्ध असावी.
* बालरुग्ण विभागाची सुधारणा: रात्रीच्या वेळी बालरुग्ण विभागात सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी गंभीर असून त्याकडे तातडीने लक्ष द्यावे.
“सामान्य माणूस उपचारासाठी सरकारी रुग्णालयात येतो, पण तिथे सुविधांअभावी त्याला खासगी रुग्णालयाकडे वळवले जाते. हा प्रकार थांबला पाहिजे. जर तातडीने सुधारणा झाली नाही, तर मनसे स्टाईलने जनआंदोलन छेडले जाईल.” रुपेश जाधव (तालुका अध्यक्ष, मनसे)
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन आणि मनसेचा इशारा
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी मनसेच्या या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि यावर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष कृती न दिसल्यास ‘खळ्ळ-खटॅक’ आंदोलनाचा इशाराही यावेळी शिष्टमंडळाने दिला.
या शिष्टमंडळात तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, ॲड. माधवी पालकर, सचिव रोहन शेलार, सर्वेश जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेचा जिल्हा प्रशासनाला ‘इशारा’: शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभारावर धडक!
Leave a Comment
