रत्नागिरी:
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मासळीचा दुष्काळ जाणवत असल्याने मच्छिमार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. डिझेलचा खर्च निघणेही कठीण झाल्यामुळे रोजगारासाठी सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत जाणाऱ्या रत्नागिरीतील पर्ससीन नेट नौकांना तिथे भयावह अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.
सिंधुदुर्गातील काही स्थानिक नौकांकडून रत्नागिरीच्या नौकांना घेराव घालून, त्यांतील मासळी जबरदस्तीने हिसकावून घेणे आणि खलाशांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे रत्नागिरीतील मच्छिमार संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, अशा अन्यायाला ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा निर्धार केला आहे.
रत्नागिरीच्या समुद्रात मासळी मिळत नसल्याने नौका मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या विवंचनेतून मार्ग काढण्यासाठी अनेक नौका सिंधुदुर्गच्या समुद्रात जात आहेत. मात्र, तिथे रत्नागिरीची नौका दिसताच स्थानिक टोळ्यांकडून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे येथील मच्छिमारांचे म्हणणे आहे.
या लुटालुटीच्या प्रकारांमुळे रत्नागिरीतील पर्ससीन नेट मालक असोसिएशन आणि जिल्हा संघटनांची तातडीची बैठक पार पडली. “जर आमच्या मच्छिमारांवर होणारे हल्ले आणि मासळीची लूट थांबली नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा संघटनांनी दिला आहे. तसेच, या प्रकरणाची रीतसर तक्रार पोलीस आणि मत्स्यव्यवसाय विभागाकडे करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
