कोकणचा झेंडा आता थेट अमेरिकन सैन्यात!
दापोली:
कोकणच्या मातीतील जिद्दी कन्या आणि दापोलीची सुकन्य प्राजक्ता भांबुरे-बोंगाळे हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर थेट अमेरिकन सैन्यात (US Army) स्थान मिळवून सातासमुद्रापार कोकणचा झेंडा फडकवला आहे. लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्राजक्ताचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
शैक्षणिक आणि करिअरचा प्रवास
दापोलीतील ए.जी. हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून बीएससी आणि मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून एंडोक्रिनोलॉजी (अंतःस्रावी विज्ञान) या विषयात एमएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यावरही तिने आपली आवड जोपासली. अमेरिकेत ‘क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट’ म्हणून कार्यरत असतानाच, तिने ‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक अलायन्स मिलेट्स ॲम्बेसेडर’ म्हणून जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, सौंदर्य क्षेत्रात ‘मिसेस मिडवेस्ट युनिव्हर्स’ हा किताबही तिने आपल्या नावे केला आहे.
सैन्यातील कठोर प्रशिक्षण आणि यश
लहानपणी एका अपघातामुळे सैन्यात जाण्याचे स्वप्न काही काळासाठी बाजूला ठेवावे लागले होते, मात्र प्राजक्ताने जिद्द सोडली नाही. अमेरिकन सैन्यातील अत्यंत कठीण आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असे आठ महिन्यांचे प्रशिक्षण तिने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणादरम्यान तिने उत्कृष्ट नेमबाजीसाठी ‘मार्क्समनशिप पदक’ मिळवले असून, संपूर्ण बॅचमध्ये सर्वोत्तम शैक्षणिक गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या ती अमेरिकन सैन्यात मेडिकल विभागात आपली सेवा देत आहे.
कुटुंबात लष्करी पार्श्वभूमी नसतानाही, केवळ स्वतःची शिस्त, नियमित व्यायाम आणि सकारात्मक मानसिकतेच्या जोरावर प्राजक्ताने मिळवलेले हे यश संपूर्ण कोकणवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.


