कोल्हापूर (प्रतिनिधी) :
“रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या ब्रीदवाक्याला जागत, रत्नागिरीचे आमदार किरण सामंत यांच्या तत्परतेमुळे आणि कोल्हापुरातील शिवसैनिकांच्या सामाजिक बांधिलकीमुळे रत्नागिरीतील एका रुग्णाच्या हृदयशस्त्रक्रियेचा मार्ग सुकर झाला आहे. दाभोळे (जि. रत्नागिरी) येथील रहिवासी चंद्रकांत दाभोळकर यांच्यावर कोल्हापूर येथील स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रिया होणार असून, त्यासाठी लागणारा रक्तपुरवठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने रक्तदान करून उपलब्ध करून दिला आहे.
चंद्रकांत दाभोळकर यांना हृदयाच्या उपचारासाठी कोल्हापूरच्या स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तातडीने हृदयशस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यासाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. परगावात ऐनवेळी रक्ताची जुळवाजुळव कशी करायची, या विवंचनेत दाभोळकर कुटुंबीय सापडले होते.
ही बाब राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी सूत्रे हलवली. कोल्हापूरमध्ये आपल्या जिल्ह्यातील नागरिकाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी तात्काळ कोल्हापूर येथील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून रक्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
आमदारांच्या आदेशाचे पालन करत, शिवसेना प्रणित ‘राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचे’ कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अमित पै आणि सचिव श्रीकांत माजगांवकर यांनी तातडीने रुग्णालयाशी व नातेवाईकांशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी आपले सहकारी कृतार्थ मिरजकर, रसिक पाटील आणि रोहन भोसले यांना सोबत घेतले. या सर्व पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथील ‘अर्पण ब्लड बँक’ येथे जाऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील शिवसेनेच्या या समन्वयामुळे एका सामान्य कुटुंबाला मोठा मानसिक आणि वैद्यकीय आधार मिळाला आहे. वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यामुळे आता चंद्रकांत दाभोळकर यांची शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडणार आहे. संकटाच्या काळात धावून आल्याबद्दल दाभोळकर कुटुंबीयांनी आमदार किरण सामंत तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानले आहेत. स्थानिक नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातूनही या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आ. किरण सामंत यांची तत्परता आणि कोल्हापूरच्या शिवसैनिकांचा पुढाकार; रत्नागिरीच्या रुग्णासाठी तातडीचे रक्तदान
Leave a Comment
