रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये देशात तिसरा क्रमांक; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी :
केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये रत्नागिरी शहराने राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील किनारपट्टीवरील शहरांच्या श्रेणीत (कोस्टल सिटीज कॅटेगरी) रत्नागिरीने देशभरात तृतीय क्रमांक पटकावत कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     रत्नागिरी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, पाणीपुरवठा सभापती निमेश नायर आणि स्वच्छता सभापती राकेश नागवेकर यांनी मंचावर उपस्थित राहून हा मानाचा सन्मान स्वीकारला.
      गेल्या वर्षभरात नगरपरिषदेने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला शिस्त लावण्यासाठी ठोस पावले उचलली होती. यासोबतच समुद्रकिनारे आणि सार्वजनिक परिसराच्या दैनंदिन स्वच्छतेवर विशेष भर दिला गेला. ओला व सुका कचरा वर्गीकरणाची काटेकोर अंमलबजावणी आणि प्लास्टिकमुक्तीसाठी सातत्याने जनजागृती मोहिमा राबवल्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यात मोठे यश आले.
      प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन, लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अहोरात्र कष्ट आणि रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त सहभाग यांच्या बळावरच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कामगिरीबद्दल संपूर्ण कोकणातून नगरपरिषद प्रशासन, पदाधिकारी आणि स्वच्छता दूतांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *