माझे जिवलग मित्र श्री. महेश सामंत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
अडीअडचणीला धावून जाणारा ‘हायस्पीड’ मित्र: महेश सामंत यांच्या ३० वर्षांच्या मैत्रीचा आणि कार्यकर्तृत्वाचा प्रवास
माझे जवळचे मित्र आणि रत्नागिरीचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांचे स्वीय सहाय्यक (PA) महेश सामंत यांचा आज वाढदिवस.
महेश सामंत बद्दल बोलायचं तर, अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि लोकांच्या अडीअडचणीला नेहमी धावून जाणारा हा माणूस. आमच्या मैत्रीला आज जवळपास ३० वर्षे पूर्ण होत आहेत, पण आजही आम्ही सख्ख्या भावांसारखे मिळूनमिसळून एकत्र आहोत. माझ्या अनेक अडचणींच्या काळात महेश नेहमीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला. जेव्हा मी राजकारणात नवीन होतो, तेव्हा महेशने मला मोलाचे राजकीय मार्गदर्शन केले आणि सतत समाजकार्य करण्याचे धडे दिले.
महेश सामंतला एक फोन केला की ते काम झालंच म्हणून समजावं! याचा प्रत्यक्ष अनुभव मी नुकताच घेतला. मी रत्नागिरीबाहेर कोल्हापूरला असताना त्यांना एका कामासाठी फोन केला आणि मी तिथे प्रत्यक्ष हजर नसतानाही त्यांनी ते काम अगदी ‘हायस्पीड’ने पूर्ण करून दाखवलं. केवळ माझं स्वतःचं कामच नाही, तर मी सांगितलेलं इतर कोणाचंही काम असो, महेशच्या तोंडून ‘नाही’ हा शब्द मी आजपर्यंत कधीच ऐकला नाही; ते काम ते नक्कीच आणि तितक्याच वेगाने पूर्ण करतात.
मला २००२ मधील एक खास आठवण आजही ताजी आहे. त्यावेळी आदरणीय उदयजी सामंत साहेब आमदारही नव्हते. मी स्वतः, स्वर्गीय राजेश सावंत, उदयजी सामंत साहेब आणि महेश सामंत आम्ही सर्वजण मिरकरवाड्यातून साहेबांच्या गाडीने पालीला निघालो होतो. त्यावेळी उदय सामंत साहेबांनी पाली येथे क्रिकेट मॅच ठेवली होती आणि या संपूर्ण मॅचच्या नियोजनाची जबाबदारी महेश सामंत यांच्या खांद्यावर होती. महेश सामंतने अत्यंत उत्कृष्ट नियोजन करून आपली ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. महेशची कामाची ही धडाडी आणि कौशल्य मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. तीच क्षमता आजही त्यांच्यामध्ये कायम आहे. साहेबांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी ते आजही तितक्याच उत्कृष्टपणे पार पाडत आहेत.
असा हा आमचा कार्यतत्पर आणि संकटात धावून येणारा मित्र महेश सामंत यास वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा! आई जगदंबा त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो, हीच प्रार्थना.
शब्बीर वस्ता,मिरकरवाडा रत्नागिरी
