आरेवारे बीचवर झिपलाईनमध्ये तरुण जोडपे हवेतच अडकले; दुसऱ्या रस्सीच्या मदतीने सुखरूप सुटका

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी :    पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या आरेवारे बीचवरील झिपलाईन राईडदरम्यान एक थरारक घटना घडली. झिपलाईनचा आनंद घेणारे एक तरुण जोडपे समुद्राच्या वर मध्यभागी अचानक अडकून पडले. खाली खवळलेला समुद्र आणि वर हवेत अडकल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यंत्रणेने तत्परता दाखवत दुसऱ्या रस्सीच्या मदतीने दोघांनाही सुखरूप खाली आणल्याने मोठा अनर्थ टळला.
     आरेवारे बीचजवळील उंच कड्यावरून थेट किनाऱ्याच्या दिशेने ही साहसी झिपलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पर्यटक सेफ्टी हार्नेसच्या साहाय्याने समुद्रावरून वेगाने खाली घसरत येतात. संध्याकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी असताना, हे तरुण जोडपे झिपलाईनवरून निघाले. मात्र, कड्यापासून पुढे आल्यानंतर समुद्राच्या बरोबर मध्यभागी तांत्रिक बिघाड किंवा हवेच्या दबावामुळे त्यांची ट्रॉली अचानक थांबली आणि दोघेही हवेतच लटकून राहिले.
     खाली अथांग समुद्र आणि लाटांचा आवाज, तर वर हवेत अडकल्याने जोडप्याची प्रचंड तारांबळ उडाली. हा प्रकार पाहून किनाऱ्यावरील पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून झिपलाईन संचालक पथकाने आणि स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. दुसऱ्या एका मजबूत रस्सीच्या साहाय्याने अडकलेल्या पर्यटकांपर्यंत पोहोचून, अत्यंत कौशल्याने त्यांना ओढत सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले.
        या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, काही मिनिटे हवेत अडकून पडल्याने संबंधित जोडप्यासह उपस्थित पर्यटकांचा चांगलाच थरकाप उडाला होता. या प्रकारामुळे साहसी खेळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *