रत्नागिरी : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत सध्या खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ग्राहकांची मोठी गर्दी, विविध वस्तूंची वाढलेली मागणी आणि बाहेरून दाखल झालेले व्यापारी यामुळे शहरातील बाजारपेठ अक्षरशः फुलून गेली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस व्यापारी वर्गासाठी मोठ्या तेजीचे ठरत असून, या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्तिकी एकादशीची जत्रा ही रत्नागिरीकरांसाठी केवळ धार्मिक किंवा पारंपरिक उत्सव नसून, खरेदीचा मोठा सोहळा म्हणूनही ओळखली जाते. या जत्रेच्या निमित्ताने मुंबईपासून गुजरातपर्यंत तसेच राज्यातील विविध भागांतून व्यापारी आणि व्यावसायिक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरून आलेल्या व्यावसायिकांनी शुक्रवार सकाळपासूनच विविध ठिकाणी दुकाने थाटण्यास सुरुवात केली. शुक्रवार रात्रीपासूनच बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.
प्रत्यक्ष कार्तिकी एकादशी शनिवारी असल्याने शनिवारी खरेदीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. रविवारीही ग्राहकांची मोठी गर्दी होऊन विक्रीत चांगली वाढ होण्याची अपेक्षा व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे तीन दिवस रत्नागिरीच्या व्यापारी वर्गासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत.
साड्यांपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत विविध वस्तूंना मागणी
जत्रेच्या निमित्ताने साड्या, कपडे, भांडी, सौंदर्यप्रसाधने, घरगुती वस्तूंसह विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने सजली आहेत. नेहमीच्या बाजारपेठेत सहज उपलब्ध न होणाऱ्या अनेक वस्तू एकाच ठिकाणी आणि तुलनेने माफक दरात मिळत असल्याने ग्राहकांचा खरेदीकडे मोठा कल दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, या जत्रेत केवळ हिंदू समाजातील नागरिकच नव्हे, तर मुस्लिम समाजातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे. विविध ऑफर्स आणि आकर्षक दरांमुळे सर्वधर्मीय नागरिकांची गर्दी बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशीची ही जत्रा सामाजिक सलोख्याचेही दर्शन घडवत आहे.
रामआळीपासून गाडीतळपर्यंत बाजारपेठ गजबजली
रामआळीपासून गोखले नाका, धनजी नाका, गाडीतळ, काँग्रेस भवन तसेच पऱ्यांच्या आळीतील विविध गल्ल्यांपर्यंत जत्रेची बाजारपेठ विस्तारली आहे. जागा मिळेल त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने थाटल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात सर्वत्र खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
स्थानिक नागरिक शुक्रवार पासूनच मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडले आहेत, तर ग्रामीण भागातील नागरिक शनिवारपासून जत्रेत सहभागी होत आहेत. अनेक नागरिक वर्षभर या जत्रेची प्रतीक्षा करत असतात. आदल्या दिवशी खरेदी करून पुढील दोन दिवस कुटुंबासह जत्रेचा आनंद घेण्याची परंपराही अनेक कुटुंबांमध्ये कायम आहे.
श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत जत्रेचा आनंद
कार्तिकी एकादशीची जत्रा ही श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरते. आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदी करणे, कुटुंबासह बाजारपेठेत फेरफटका मारणे, विविध दुकानांना भेट देणे आणि जत्रेचा आनंद लुटणे यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या जत्रेमुळे बाहेरगावच्या व्यापाऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते, तर स्थानिक नागरिकांनाही विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी मिळते. त्यामुळे कार्तिकी एकादशीची जत्रा रत्नागिरीच्या स्थानिक अर्थकारणाला चालना देणारी आणि सामाजिक सलोखा जपणारी परंपरा ठरत आहे.
एकंदरीत, तीन दिवसांच्या या खरेदी उत्सवामुळे रत्नागिरी शहराची बाजारपेठ अक्षरशः गजबजून गेली आहे. ग्राहकांची गर्दी, वाढलेली खरेदी आणि व्यापाऱ्यांमधील उत्साह पाहता ‘रत्नागिरी गरीब कोण म्हणतं?’ हा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
कार्तिकी एकादशी ठरली व्यापाऱ्यांसाठी ‘लकी’; रत्नागिरीत कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित!
Leave a Comment
