दामले विद्यालयाच्या चार शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

Shabbir Vasta
2 Min Read

अकोला येथे पुरस्कार वितरण सोहळा; रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

रत्नागिरी : अकोला येथे महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार सोहळ्यात रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाच्या चार शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

अकोला येथील माहेश्वरी सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास खासदार अनुप धोत्रे, आमदार बच्चू कडू, आमदार संजयजी खोडके, आमदार साजिद पठाण, आमदार नितीन देशमुख, पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, शिक्षक आमदार किरण सरनाईक, नगरपालिका-महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी, अकोल्याचे उपमहापौर अमोल गोगे आदी मान्यवर उपस्थित होते.

दामले विद्यालयाने गेल्या काही वर्षांत केलेली उल्लेखनीय प्रगती, शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी केलेले योगदान तसेच शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत चार शिक्षकांची राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली होती.

यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, सौ. सिद्धी विचारे यांना सक्षम आदर्श महिला पुरस्कार, सौ. श्रद्धा गांगण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, तर श्री. योगेश कदम यांना तंत्रस्नेही आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दामले विद्यालयाने गेल्या काही वर्षांत शैक्षणिक गुणवत्तेसह विविध क्षेत्रांत झपाट्याने प्रगती करत राज्यभरात एक प्रेरणादायी शाळा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. एकाच विद्यालयातील चार शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या सन्मानामुळे दामले विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे प्रशासन अधिकारी नरेंद्र गावंड, विस्तार अधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद संसारे तसेच सर्व पालकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *