लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी, वेरळ, लांजा शहर तसेच वाकेड परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने आवश्यक व कायमस्वरूपी सुरक्षितता उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंजणारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती शिवसेनेचे लांजा तालुकाप्रमुख युवराज मारुती हांदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना विविध ठिकाणी निर्माण झालेल्या त्रुटी आणि अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
विशेषतः अंजणारी, वेरळ, लांजा शहर आणि वाकेड परिसरात अपघातप्रवण ठिकाणांची संख्या वाढली असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना न करता अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षितता व्यवस्था निर्माण करावी, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनात परिसरातील नागरिक, वाहनचालक तसेच जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन तालुकाप्रमुख युवराज हांदे यांनी केले आहे.
सर्वसामान्य जनतेची सुरक्षितता आणि प्रवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात येत असून, आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजनांसाठी अंजणारीत उद्या रास्ता रोको
Leave a Comment
