रत्नागिरी जिल्ह्यात इंधनाचा ठणठणाट; ऐन सुट्ट्यांच्या हंगामात वाहनधारक आणि पर्यटक वेठीस!

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे जिल्हावासीय आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत आहेत. एप्रिल-मे महिन्यातील लग्नसराई आणि पर्यटनाचा हंगाम ऐन भरात असतानाच पेट्रोल-डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठे संकट ओढवले आहे.
     रत्नागिरी जिल्ह्याला प्रामुख्याने मिरज आणि हजारवाडी येथील डेपोमधून इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा केला जातो. जिल्ह्याची दैनंदिन गरज भागवण्यासाठी दररोज साधारण ६० ते ७० टँकर्सची आवश्यकता असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या डेपोंमधून मागणीनुसार टँकर उपलब्ध होत नसल्याने पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे.
     मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. त्यातच लग्नसराईचे मुहूर्त असल्याने खासगी वाहनांची वर्दळही वाढली आहे. परिणामी, इंधनाची मागणी नेहमीपेक्षा १० ते २० टक्क्यांनी वाढली आहे. मागणी वाढलेली असताना पुरवठा मात्र घटल्याने अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक पाहायला मिळत आहेत.
     इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. लांबून आलेल्या अनेक पर्यटकांना इंधनाअभावी आपला पुढचा प्रवास रद्द करावा लागत आहे, तर स्थानिकांना कामावर जाण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.
     जर येत्या दोन-तीन दिवसांत मिरज आणि हजारवाडी डेपोतून पुरवठा सुरळीत झाला नाही, तर जिल्ह्यातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आता प्रशासनाने आणि संबंधित तेल कंपन्यांनी यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *