जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची गरुडझेप; ५२ विद्यार्थी जाणार ‘इस्रो’ दौऱ्यावर

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ५२ गुणवंत विद्यार्थी येत्या १९ मे पासून अंतराळ क्षेत्रातील जगातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘इस्रो’ च्या शैक्षणिक दौऱ्यावर रवाना होणार आहेत. हा विशेष दौरा २६ मे पर्यंत चालणार असून, यामध्ये मंडणगड ते राजापूर अशा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे .

या अनोख्या दौऱ्यात विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन केंद्र प्रत्यक्ष अनुभवण्याची, रॉकेट प्रक्षेपण पाहण्याची सुवर्णसंधी, इस्रोची मुख्य इमारत आणि व्हीएससी संग्रहालयाला भेट देण्याची संधी मिळणार आहे . अंतराळ विज्ञानासोबतच त्रिवेंद्रम येथील प्रियदर्शनी तारांगण, प्राणी संग्रहालय, राजा रविवर्मा आर्ट गॅलरी तसेच बेंगळुरूमधील ऐतिहासिक बेंगळूर पॅलेस व लालबाग बॉटनिकल गार्डन अशा विविध शैक्षणिक व पर्यटन स्थळांनाही विद्यार्थी भेट देणार आहेत.
हा इस्रो दौरा केवळ पर्यटनाचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या कठीण बौद्धिक कसोटीचा परिणाम आहे. एका अत्यंत कठीण निवड चाचणी परीक्षेच्या प्रक्रियेतून तावून-सुलाखून निघाल्यानंतरच या गुणवंत विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे . रत्नागिरी जिल्हा परिषदेने गेल्या चार-पाच वर्षांत नासा (अमेरिका) आणि इस्रो सारखे अत्यंत महत्त्वाकांक्षी व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या यशस्वी पॅटर्नची दखल घेत आता राज्य शासनानेही संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना अमेरिका व नासा दौऱ्यावर नेण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे, जो जिल्ह्यासाठी मोठा बहुमान आहे .

आजच्या काळात पालकांचा खाजगी शाळांकडे मोठा ओढा असताना, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अशा दर्जेदार व लक्षवेधी उपक्रमांमुळे जून महिन्यात सरकारी शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गांमधील पटसंख्या आणि प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रवासादरम्यान ५२ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व काळजीवाहू म्हणून शिक्षण विभागाचे अधिकारी आणि अनुभवी शिक्षकांसह एकूण ११ जणांचे पथक सोबत असणार आहे . रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी इस्रो दौऱ्यावर जाणाऱ्या सर्व बालवैज्ञानिकांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या मार्गदर्शक पथकाला यशस्वी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *