खोडदे गावचा सुपुत्र अनुज साळवीची सिंगापूर शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड

Shabbir Vasta
1 Min Read

गुहागर (प्रतिनिधी):
तालुक्यातील खोडदे गावचा होतकरू विद्यार्थी अनुज संदेश साळवी याची सिंगापूर येथील प्रतिष्ठित शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर अनुजने हे यश संपादन करून संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे.
     अनुज सध्या ‘रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल’ (ता. खेड) येथे शिक्षण घेत आहे. पुण्याच्या ‘स्वान’ (SWAN) फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परीक्षेत अनुजने उत्कृष्ट कामगिरी करत सिंगापूरच्या या विशेष दौऱ्यासाठी आपले स्थान निश्चित केले आहे. या निवडीमुळे अनुजला २६ ते ३० एप्रिल या कालावधीत सिंगापूरमधील विविध शैक्षणिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
     या अभ्यास दौऱ्यादरम्यान अनुजला सिंगापूरमधील आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था, विज्ञान संग्रहालये आणि तिथल्या विकासकामांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. अनुजचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौरा असून, त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि जागतिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा अनुभव अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
     अनुजच्या या उल्लेखनीय यशामुळे खोडदे गाव, त्याचे शिक्षण घेत असलेली शाळा आणि नवोदय विद्यालय या सर्वांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या यशाबद्दल गावकरी, शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून, अनुज भविष्यातही अशीच उत्तरोत्तर प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *