फिफा वर्ल्ड कप २०२६: अवघ्या जगाला वेड लावणारा फुटबॉलचा महासंग्राम आजपासून सुरू!

Shabbir Vasta
4 Min Read

आजपासून पृथ्वी गोल आहे हे केवळ भूगोलाच्या पुस्तकामुळे नव्हे, तर फुटबॉलमुळे सिद्ध होणार आहे. कारण पुढचे सात आठवडे जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच चेंडूभीवती अब्जावधी नजरा फिरणार आहेत. घडय़ाळाचे काटे वेळ दाखवतील, पण जगाची धडधड ९० मिनिटांच्या तालावर चालेल.
     अवघं जग पुढील ५० दिवस फुटबॉलभोवती गोल फिरणार आहे. फुटबॉलच्या फिफा वर्ल्ड कपची (FIFA World Cup 2026) पहिली गर्जना आज मेक्सिको सिटीतून होणार असून या महागर्जनेत काही जण मैदानावर घाम गाळतील, तर अब्जावधी लोक टीव्ही, मोबाईल आणि स्टेडियमच्या आसनांवरून आपल्या भावनांचा उद्रेक करतील. काही देशांत सकाळचा चहा फुटबॉलसोबत पचेल, तर काही ठिकाणी मध्यरात्रीची झोप फुटबॉलसाठी बलिदान दिली जाईल. कार्यालयांमध्ये अचानक ‘सर्दी’ वाढेल, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची ‘गोलपोस्ट’ हलतील आणि जगभरातील घराघरांतून एकच आवाज घुमेल… गोल! जणू अवघ्या जगाचा एकच धर्म असेल, तो म्हणजे फुटबॉल.

तीन देशांच्या यजमानपदाखाली ऐतिहासिक स्पर्धा
अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांच्या खांद्यावर उभी राहिलेली ही स्पर्धा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच ४८ संघ मैदानात उतरणार असून १०४ सामन्यांचे महायुद्ध एकाच वेळी तिन्ही देशांत धडाडणार आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक ७८ सामने अमेरिकेतील ११ शहरांमध्ये रंगतील, तर मेक्सिको आणि कॅनडात प्रत्येकी १३ सामने खेळविले जातील. सर्वाधिक ९ सामने डल्लासच्या स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. तसेच अटलांटा, न्यूयॉर्क, लॉस एंजलिस येथे प्रत्येकी आठ सामने होतील.
सर्वधिक सामने अमेरिकेत होत असले तरी उद्घाटनाचा मान मेक्सिको सिटीला मिळाला आहे. यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उद्घाटनीय लढतीने या फुटबॉल महायुद्धाची ठिणगी पडेल.

महागडी तिकिटे आणि व्हिसा किचकटतेमुळे चाहत्यांमध्ये नाराजी
या स्पर्धेनिमित्ताने अमेरिकेने तिकिटांचे दर लाखांच्या घरात ठेवल्यामुळे जगभरातील चाहते प्रचंड संतप्त झाले आहेत. तसेच व्हिसा प्रक्रियाही अत्यंत किचकट केल्यामुळे हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी आपला वर्ल्ड कप दौरा रद्द केला आहे. याचा मोठा फटका अमेरिकेला बसला असून परदेशी पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असण्याची शक्यता आहे. हॉटेल आणि अन्य निवास व्यवस्थेनेही फुटबॉल चाहत्यांना लुटण्याचा प्लॅन केल्यामुळे चाहत्यांमुळे यशस्वी ठरणारी ही स्पर्धा प्रत्यक्षात किती यशस्वी होते, ते येत्या आठवड्यातच कळेल.

सुपरस्टार्शवर खिळणार नजरा
यंदा वर्ल्ड कपमध्ये अनेक नव्या दमाचे खेळाडू चमकतीलच, पण तरीही सर्वांच्या नजरा ‘जुनं ते सोनं’ प्रमाणे दिग्गज सुपरस्टार्सवर खिळल्या आहेत. यामध्ये खालील खेळाडूंचा समावेश आहे:
* **किलियन एमबाप्पे** (फ्रान्स) – वेगवान वादळ
* **ज्यूड बेलिंगहॅम** (इंग्लंड) – मध्यरक्षक जादूगार
* **लामीन यामल** (स्पेन) – तरुण आणि कल्पक खेळाडू
* **विनिसियस ज्युनियर** (ब्राझील) – ब्राझिलियन स्टार
* **एार्ंलग हालांद** (नॉर्वे) – गोलमशीन
* **ख्रिस्तियानो रोनाल्डो** (पोर्तुगाल) – अजूनही न थकलेला योद्धा
काहींसाठी हा पहिला वर्ल्ड कप असेल, तर काहींसाठी अखेरचा. म्हणूनच प्रत्येक किक, प्रत्येक गोल आणि प्रत्येक अश्रू इतिहासात नोंदवले जाणार आहेत. वर्ल्ड कपच्या महासंग्रामात पुढचे सात आठवडे अवघं जग दोन भागांत विभागले जाईल—एक भाग खेळणार आणि दुसरा भाग पाहणार! पण दोघांच्याही शिरांतून वाहणारं रक्त ते फुटबॉलचंच असेल.

फिफा वर्ल्ड कप २०२६: काही महत्त्वाच्या गोष्टी एका दृष्टिक्षेपात

| **यजमान देश** | अमेरिका, मेक्सिको, कॅनडा |
| **एकूण संघ** | ४८ संघ (पहिल्यांदाच) |
| **एकूण सामने** | १०४ सामने |
| **कालावधी** | अंदाजे ५० दिवस (७ आठवडे) |
| **उद्घाटनीय सामना** | मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका (मेक्सिको सिटी) |
| **सर्वाधिक सामने** | अमेरिका (७८ सामने), डल्लास येथे सर्वाधिक ९ सामने |

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *