राजापूरकरांसाठी ऐतिहासिक सुवर्णक्षण! ग्रामीण रुग्णालयात आता रक्ताचा तुटवडा संपणार; आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

Shabbir Vasta
2 Min Read

राजापूर : विशेष प्रतिनिधी राजापूर तालुक्याच्या आरोग्य सेवेच्या इतिहासातील एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतीकारक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली असून, राजापूर ग्रामीण रुग्णालयातील प्रस्तावित ‘रक्त साठवण केंद्राला’ (Blood Storage Unit) शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राजापूरच्या आरोग्य वैभवात आता मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आता जीव वाचवण्यासाठी रत्नागिरीची धावपळ थांबणार!
तालुक्यातील अपघातग्रस्त रुग्ण, गुंतागुंतीची प्रसूती असणाऱ्या माता आणि तातडीने रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी हे केंद्र ‘संजीवन’ ठरणार आहे. यापूर्वी रक्ताच्या एका पिशवीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रत्नागिरी किंवा इतर शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. अनेकदा प्रवासात जाणारा वेळ जीवावर बेतत असे. मात्र, आता स्थानिक पातळीवरच रक्त उपलब्ध होणार असल्याने ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार करणे शक्य होणार आहे.

आमदार किरण सामंत यांचा ‘शब्द’ खरा ठरला! या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार किरण सामंत यांनी शासन दरबारी आणि आरोग्य विभागाकडे सातत्याने आग्रही पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला शहराप्रमाणेच आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा त्यांचा ध्यास अखेर यशस्वी झाला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच राजापूरच्या आरोग्य सेवेतील एक मोठी अडचण दूर झाली आहे.
     नातेवाईकांचा प्रवासाचा वेळ आणि पैसा वाचणार. दुर्गम भागातील रुग्णांना मोठा आधार मिळणार. या ऐतिहासिक निर्णयाचे राजापूर तालुक्यातील जनतेने आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. “आरोग्य संपन्न राजापूर” घडवण्याच्या दिशेने हे एक आश्वासक पाऊल मानले जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *