रत्नागिरी दि. ३१ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड कोकण विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने हे सोमवार, १ जून रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी १० वाजता अभ्युदय नगर, नाचणे रोड येथील शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व शक्तिप्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसहकार सेना, रिक्षासेना आणि इतर संलग्न संघटनांच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने बाळ माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमातून आघाडीची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या निवडणुकीकडे कोकणातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम (दक्षिण) आणि विक्रांत जाधव (उत्तर) यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
Leave a Comment
