रत्नागिरी : रत्नागिरीच्या मातीत शुक्रवारी आणि शनिवारी जणू चंद्राचा प्रकाश जमिनीवर उतरला होता! ३० दिवसांच्या खडतर उपासनेनंतर (रोजा) आलेल्या रमजान ईदचा उत्सव रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात पार पडला. पण या संपूर्ण उत्सवात खरी बाजी मारली ती मिरकरवाड्याने! येथील रोषणाई आणि उत्साह पाहून उपस्थित प्रत्येक जण मंत्रमुग्ध झाला.
मिरकरवाडा परिसरातील सात मोहल्ले आणि चार प्रमुख मशिदींवर करण्यात आलेली नयनरम्य विद्युत रोषणाई पाहण्यासाठी अख्ख्या रत्नागिरीने गर्दी केली होती. विशेषतः पांजरी मोहल्ल्यातील चांद-ताऱ्यांची सजावट आणि सेल्फी पॉईंट्स तरुणाईसाठी विशेष आकर्षण ठरले.
अवघ्या ४ ते ५ वर्षांच्या चिमुकल्यांनी उन्हाच्या तीव्रतेतही पूर्ण ३० दिवस रोजा धरून आपला ईमानी जज्बा दाखवून दिला. त्यांचे सर्वत्र भरभरून कौतुक झाले. आखाती देशांत युद्धाचे सावट असताना आणि विमानाची महागडी तिकिटे असतानाही, आपल्या मातीतील ईद साजरी करण्यासाठी अनेक चाकरमान्यांनी रत्नागिरी गाठली.
ना. उदय सामंत यांची ‘ईद गळाभेट’
उत्सवाचा रंग तेव्हा अधिकच गडद झाला जेव्हा राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी प्रत्यक्ष मिरकरवाड्यात हजेरी लावली. त्यांनी मुस्लीम बांधवांची आपुलकीने विचारपूस केली आणि त्यांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “हा सण केवळ आनंदाचा नसून तो सामाजिक ऐक्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. नामदारांच्या या भेटीने हिंदू-मुस्लिम बांधवांच्या मनातील स्नेह अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
जेव्हा राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी प्रत्यक्ष मिरकरवाड्यात हजेरी लावली. यावेळी त्यांचे जुने सहकारी व जिवलग मित्र शब्बीर वस्ता त्यांच्यासोबत होते.याप्रसंगी नगरसेवक सोहेल साखरकर,नगरसेविका अफरीन होडेकर,माजी नगरसेवक नुरुद्दीन पटेल, चेअरमन इमरान मुकादम, मझर मुकादम, राजू शेठ, मसूद मुकादम,उबेद होडेकर, यासीन मजगावकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. उदय सामंत यांनी सर्व मुस्लीम बांधवांची आपुलकीने विचारपूस केली आणि त्यांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या भेटीने परिसरातील आनंदाचे वातावरण अधिकच द्विगुणित झाले.






