२०० कोटींचे लग्न अन् ९४ हजार कोटींचे नेटवर्क; सौरभ चंद्राकरच्या काळ्या साम्राज्याची इनसाईड स्टोरी
मुंबई:
छत्तीसगडमधील भिलाई येथे कुटुंबाच्या छोट्याशा ज्यूस सेंटरमध्ये काम करून दरमहा अवघे १५ हजार रुपये वेतन घेणारा सौरभ चंद्राकर आज तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. अवघ्या काही वर्षांत त्याने ‘महादेव ऑनलाइन बुक’ या अवैध बेटिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल ९४ हजार ४०० कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केल्याचे उघड झाले आहे. ओमानमधून भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर या प्रकरणातील थक्क करणारे खुलासे समोर येत आहेत.
ज्यूस सेंटर ते २०० कोटींचे लग्न: सौरभचा प्रवास
सौरभ चंद्राकर हा मूळचा भिलाईचा रहिवासी असून त्याचे वडील महापालिकेत लिपिक होते. भिलाईत त्यांच्या कुटुंबाचे ‘ज्यूस फॅक्टरी’ नावाचे दुकान होते, जिथे सौरभ काम करत असे. डिसेंबर २०२० पर्यंत तो या दुकानातून महिन्याला केवळ १५ हजार रुपये वेतन घेत होता.
त्यानंतर अवघ्या काही वर्षांत त्याचे जीवन पूर्णपणे बदलले. दुबईत अलिशान जीवनशैली, परदेशात कोट्यवधींच्या मालमत्ता आणि तब्बल २०० कोटी रुपये खर्चून केलेला विवाहसोहळा यामुळे सौरभ आणि त्याचे बेटिंग सिंडिकेट पहिल्यांदा तपास यंत्रणांच्या मोठ्या प्रमाणावर नजरेत आले.
रवी उप्पलसोबत भेट आणि बेटिंग सिंडिकेटची सुरुवात
ज्यूस सेंटरमध्ये काम करत असतानाच सौरभची ओळख रवी उप्पल याच्याशी झाली. रवी वारंवार त्याच्या दुकानात येत असे. या भेटीचे रूपांतर पुढे व्यावसायिक भागीदारीत झाले. दोघांनी मिळून ‘महादेव ऑनलाइन बुक’ या ऑनलाइन सट्टा प्लॅटफॉर्मची पायाभरणी केली आणि अल्पावधीतच त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार केला.
कसे चालायचे ९४,००० कोटींचे नेटवर्क?
* दुबईतून मुख्य नियंत्रण: महादेव ॲपचे संपूर्ण सूत्रसंचालन आणि आर्थिक व्यवहार दुबईतील मुख्य कार्यालयातून चालवले जात होते.
* फ्रँचायझी मॉडेल: व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी फ्रँचायझी पद्धतीने बेटिंग पॅनेल्स विकली जात होती. देशभरातील स्थानिक ऑपरेटर ग्राहकांना आयडी उपलब्ध करून देत सट्टा खेळण्यास प्रवृत्त करत होते.
* ३,२०० हून अधिक पॅनेल्स: तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये मिळून ३,२०० हून अधिक बेटिंग पॅनेल्स कार्यरत होती.
* मास्टर आयडी व पासवर्ड: स्थानिक ऑपरेटरांना थेट दुबईतील मुख्यालयातून मास्टर आयडी आणि पासवर्ड दिले जात, ज्याद्वारे रोज कोट्यवधी रुपयांची अवैध उलाढाल केली जात असे.
