कोकणातील प्रवाशांची प्रतीक्षा संपणार; चिपीपाठोपाठ रत्नागिरी विमानतळही प्रवासी सेवेसाठी सज्ज

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी :   कोकणातील हवाई संपर्काला मोठी गती मिळाली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईसाठीची विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर आता रत्नागिरी विमानतळावरूनही प्रवासी उड्डाणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची दाट शक्यता असून, यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा मुंबईशी थेट आणि वेगवान संपर्क प्रस्थापित होणार आहे.
     राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. रत्नागिरीतील मिर्जोळे येथील विमानतळावर अवघ्या दोन वर्षांच्या विक्रमी कालावधीत सुसज्ज अशी नवीन प्रवासी टर्मिनल इमारत उभारून पूर्ण झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाचा तळ असलेल्या या विमानतळाचे ‘उडान’ योजनेअंतर्गत नागरी उड्डाणांसाठी विस्तारीकरण करण्यात आले असून, धावपट्टीचे कामही पूर्णत्वास गेले आहे.
      दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड प्रकल्पांतर्गत उभारलेल्या चिपी विमानतळावरूनही १६ नोव्हेंबर २०२६ पासून नवी मुंबईसाठी आठवड्याचे सातही दिवस थेट विमानसेवा सुरू झाली आहे. राज्य सरकारने ‘व्हायबल गॅप फंडिंग’ (VGF) उपलब्ध करून दिल्याने ही सेवा आता अखंडित सुरू राहणार आहे.
      रस्ते किंवा रेल्वेमार्गे मुंबई ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रवासासाठी ६ ते १० तासांचा कालावधी लागतो. मात्र, या दोन्ही विमानतळांमुळे हा प्रवास आता अवघ्या एक तासावर आला आहे. चिपी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने मालवण, तारकर्ली आणि वेंगुर्ला येथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शहरात दोन मोठी पंचतारांकित हॉटेल्स उभी राहत असून, त्यातून स्थानिक तरुणांसाठी शेकडो रोजगार उपलब्ध होणार आहेत. तसेच हापूस आंबा, काजू आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या कोकणातील उत्पादनांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जलदगतीने पोहोचवण्यासाठी ही दोन्ही विमानतळे कोकणच्या विकासाची नवी दारे उघडणार आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *