कधी निधीचा अभाव, तर कधी सेवापुस्तक पडताळणी; एजाज इब्जी यांचा प्रशासनावर सवाल
चिपळूण : सेवानिवृत्त शिक्षक एजाज महमूद इब्जी यांचे स्वग्रामी बिल तब्बल ३६ हजार १२० रुपये गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतरही आजपर्यंत त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळालेली नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
पंचायत समिती चिपळूणकडून १ एप्रिल २०२५ रोजी देण्यात आलेल्या लेखी पत्रात जिल्हा व तालुका स्तरावर अनुदान जमा झाले नसल्यामुळे बिल खर्ची टाकता आले नसल्याचे नमूद करण्यात आले होते. अनुदान प्राप्त झाल्यानंतर बिल अदा करण्यात येईल, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही रक्कम मिळाली नसल्याचे इब्जी यांनी सांगितले.
या प्रकरणाचा त्यांनी दोन वेळा पेन्शन अदालतीमध्ये पाठपुरावा केला. २ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या पेन्शन अदालतीमध्ये पुन्हा हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी त्यांना नवीन पत्र देण्यात आले. या पत्रानुसार स्वग्रामी नोंदीच्या पडताळणीसाठी सेवापुस्तक मागविण्यात आले असून, जिल्हा परिषद रत्नागिरीकडून मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत एजाज इब्जी यांनी सवाल उपस्थित केला आहे. “माझे सेवापुस्तक चिपळूण कार्यालयातच होते, तर यापूर्वी त्याची पडताळणी का करण्यात आली नाही? २०२५ मध्ये केवळ निधीचा प्रश्न असल्याचे सांगण्यात आले, तर २०२६ मध्ये अचानक सेवापुस्तक पडताळणीचा विषय कसा निर्माण झाला?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
वृद्धापकाळात औषधोपचार व दैनंदिन गरजांसाठी ही रक्कम महत्त्वाची असल्याचे सांगत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्वग्रामी बिलाची रक्कम अदा करावी तसेच झालेल्या विलंबाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
सेवानिवृत्त शिक्षकाचे स्वग्रामी बिल दोन वर्षांपासून प्रलंबित
Leave a Comment
