संगमेश्वरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी!
संगमेश्वर | १ ऑगस्ट :
लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दोन्ही महान राष्ट्रपुरुषांच्या विचार, कार्य आणि योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले की, “कोणत्याही वैचारिक चळवळीला तात्काळ प्रतिसाद मिळत नाही. अण्णा भाऊ साठे यांनी स्वतः अनुभवलेले वास्तव, शोषितांचे दुःख आणि वेदना आपल्या साहित्याद्वारे प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या जन्मजात प्रतिभा, सामाजिक जाण आणि सर्जनशीलतेमुळे त्यांनी शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या संघर्षाचा अमूल्य साहित्यिक ठेवा निर्माण केला.”
यावेळी डॉ. संतोष खरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणेचा स्रोत उलगडून सांगताना, कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्या साहित्यावर झालेला प्रभाव स्पष्ट केला. समाजातील उपेक्षितांच्या न्यायाच्या लढ्याला या विचारवंतांचे तत्त्वज्ञान अत्यंत प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांनी आपल्या मनोगतात, लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचार व कार्याची आजच्या काळात अधिक व्यापक जनजागृती होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रणसे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल नेमण यांनी केले, तर आभार प्रदर्शन पूजा प्रसाद यांनी मानले.
