आंबा घाटात मुसळधार पावसामुळे रस्त्याला पडल्या भेगा; आमदार किरण सामंत यांच्याकडून तातडीची पाहणी!

Shabbir Vasta
2 Min Read

साखरपा / आंबा घाट:
गेल्या दोन आठवड्यांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका आता वाहतूक व्यवस्थेला बसू लागला आहे. कोल्हापूर–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटात काही ठिकाणी रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून, रस्ता खचण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार किरण सामंत यांची तात्काळ घटनास्थळी भेट
आंबा घाटातील रस्ता धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळताच, लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आपल्या नियोजित दौऱ्यात तातडीने बदल करून थेट घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या कडक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान त्यांनी रस्त्यावरील भेगा, पावसामुळे झालेली जमिनीची हालचाल आणि संभाव्य धोक्याची गांभीर्याने पाहणी केली. घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात होणारी मालवाहतूक व प्रवासी वाहतूक पाहता कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणार सविस्तर चर्चा
या गंभीर प्रकरणाबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासोबत आज सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली. या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पुढील तातडीच्या उपाययोजनांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
रस्त्याच्या सुरक्षिततेचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे, वाहतुकीसंदर्भातील पुढील नियोजन करणे तसेच वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांमध्ये चिंता, प्रशासनाकडून सतर्कतेचे निर्देश
आंबा घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनावश्यक दुवा असल्याने, स्थानिक नागरिकांनीही रस्त्यावरील भेगांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळणे, माती खचणे आणि रस्त्याचे नुकसान होण्याच्या घटना सतत वाढल्याने प्रशासनाने हायअलर्टवर राहण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्त्याची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असून, यावर शासन व प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *