कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याची ‘सिंघम’ कामगिरी! तुतारी एक्स्प्रेसमध्ये धाडसाने पकडले चोर; १० हजारांचे बक्षीस जाहीर

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी: धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे तुतारी एक्स्प्रेसमधील मोठी चोरी उघडकीस आली आहे. सचिन सावेकर असे या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांच्या प्रसंगावधानामुळे दोन सराईत चोरांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.
    .दिनांक १६ फेब्रुवारी रोजी ट्रेन क्रमांक ११००४ ‘तुतारी एक्स्प्रेस’मध्ये सचिन सावेकर ड्युटीवर होते. गाडी रोहा स्थानक ओलांडून पुढे जात असताना, पहाटेच्या सुमारास त्यांना S2, S3 आणि S4 डब्यांमध्ये दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असताना हे दोघे चोरट्या पावलांनी हालचाली करत होते.
      परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सावेकर यांनी वेळ न दवडता इतर प्रवाशांना सावध केले. संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सावेकर यांनी प्रवाशांच्या मदतीने त्यांचा पाठलाग केला आणि अखेर S8 कोच मधून त्या दोघांनाही झडप घालून ताब्यात घेतले.
     खाक्या दाखवताच आरोपींनी एका महिला प्रवाशाची बॅग चोरल्याची कबुली दिली. झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र,कानातले आणि बुगडी,४,७५० रुपये रोख रक्कम,मोबाईल फोन सापडले.
      ही संपूर्ण कारवाई १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास पार पडली. त्यानंतर तातडीने दोन्ही संशयितांना रेल्वे संरक्षण दल (RPF) पनवेल यांच्या ताब्यात देण्यात आले.
     सचिन सावेकर यांच्या या धाडसी कामगिरीची दखल कोकण रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.कोकण रेल्वेचे सीएमडी (KRCL) यांनी सावेकर यांचे अभिनंदन करत त्यांना १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.रेल्वेचे संचालक आणि विभागप्रमुखांनीही त्यांच्या ‘अलर्ट’ कामगिरीचे विशेष कौतुक केले असून, प्रवाशांनीही सावेकर यांच्या या तत्परतेचे आभार मानले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *