पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप हॅक; उदय सामंत यांचे मोबाईलसह सोशल मीडिया अकाऊंट हॅक
मुंबई : राज्यात सायबर गुन्हेगारांनी आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक करून त्यावर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करण्यात आले. या घटनेनंतर राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनीही आपला मोबाईल तसेच फेसबुक आणि ‘एक्स’ अकाऊंट हॅक झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.४६ वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अचानक आक्षेपार्ह व्हिडीओ दिसू लागले. त्यांच्या खात्यावरून सुमारे १५ ते २० व्हिडीओ प्रसारित झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. प्रकार लक्षात येताच सायबर यंत्रणा तातडीने सक्रिय झाली.
सुमारे ५० मिनिटे ते एक तास हे व्हिडीओ व्हॉट्सॲप स्टेटसवर दिसत होते. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास संबंधित खाते बंद करून आक्षेपार्ह व्हिडीओ हटविण्यात आले. हे खाते नेमके कशा पद्धतीने हॅक करण्यात आले आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू आहे.
उदय सामंत यांचाही धक्कादायक खुलासा
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही आपल्याला सायबर हॅकिंगचा अनुभव आल्याचे सांगितले. आपला मोबाईल तसेच फेसबुक आणि ‘एक्स’ अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सायबर हल्ल्यात आपल्याला ३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
वाढते तंत्रज्ञान आणि सायबर गुन्हेगारांची वाढती सक्रियता यामुळे अशा घटना घडत असल्याचे सामंत यांनी सांगितले. पोलिसांनाही सायबर हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो, असे मत व्यक्त करताना, ‘पोलीससुद्धा माणूसच आहेत; त्यांच्याकडे कोणतीही वेगळी शक्ती नाही. त्यामुळे त्यांचाही मोबाईल हॅक होऊ शकतो,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या घटनांमुळे सामान्य नागरिकांपासून मंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच सायबर गुन्हेगार लक्ष्य करू शकतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोबाईल, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया खात्यांच्या सुरक्षेबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही सायबर हॅकर्सचा फटका
Leave a Comment
