रत्नागिरी:
रत्नागिरीतील भाट्ये खाडीत साचणाऱ्या गाळामुळे मासेमारी नौकांना होणारा त्रास आता लवकरच थांबणार आहे. भाट्ये ते मांडवी दरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीचा ‘ग्रोएन्स टाईप’ संरक्षक बंधारा बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
भाट्ये पूल ते मांडवी दरम्यान समुद्रात १ हजार मीटर लांबीचा बंधारा बांधला जाणार आहे. यामुळे समुद्राच्या लाटांसोबत येणारा गाळ अडवला जाईल आणि खाडीचा मार्ग (Channel) सुरक्षित राहील. सध्या खाडीत साचलेला गाळ काढण्यासाठी १२५ कोटींहून अधिक रुपयांच्या कामाला देखील मंजुरी मिळाली असून, हे कामही लवकरच सुरू होईल.
या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या २-३ वर्षांपासून मेरीटाईम बोर्डाकडे याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांना बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची देखील मोलाची साथ लाभली.
भाट्ये किनाऱ्यावर सध्या साफसफाईचे काम ‘निर्माण कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदार कंपनीने सुरू केले आहे. तसेच भाट्ये पूल ते पोलीस चौकी दरम्यान किनाऱ्यावर उतरण्यासाठी रस्ता तयार करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.या प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमारांना दिलासा मिळणार असून, नौकांचे येण्या-जाण्याचे चॅनेल सुरक्षित झाल्यामुळे मासेमारी व्यवसायाला मोठी मदत होणार आहे.
भाट्ये खाडीतील गाळाचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार; ९५ कोटींचा बंधारा मंजूर! पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश!
Leave a Comment
