रत्नागिरी :
मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असतानाच रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. धरणातील जिवंत पाणीसाठा झपाट्याने घटल्याने शहरासमोर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास रत्नागिरीकरांना आगामी काळात ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
सध्या शीळ धरणात अवघा ०.५८ दशलक्ष घनमीटर इतकाच जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. दुसरीकडे, रत्नागिरी शहराची दररोजची पाण्याची गरज सुमारे १९ ते २० दशलक्ष लिटर इतकी आहे. सद्यस्थिती पाहता हा उपलब्ध साठा केवळ पुढील १५ ते २० दिवस पुरेल, असा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
सध्या आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून सुरू आहे. मात्र, पावसाने आणखी दडी मारल्यास हे नियोजन अपुरे पडू शकते. याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठा करण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन घेतला आहे. यासाठी शहराचे विभागनिहाय नियोजन करून आलटून-पालटून पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास धरणातील ०.५० दशलक्ष घनमीटर ‘मृत पाणीसाठा’ (Dead Storage) उपसण्याचा पर्यायही प्रशासनासमोर उपलब्ध आहे. मात्र, हा साठा वापरणे हा शेवटचा उपाय मानला जात असून, त्यापूर्वी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा समितीचे सभापती निमेश नायर यांनी शीळ धरणाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत प्रशासनाशी सविस्तर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शहरावर ओढवलेले हे संकट पाहता नागरिकांनीही पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने, काळजीपूर्वक आणि काटकसरीने करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरीकरांवर पाणीटंचाईचे सावट! शीळ धरणात अवघा १५ ते २० दिवसांचा साठा; ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठ्याची शक्यता
Leave a Comment
