रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील पार्किंग शुल्काचा वाद अखेर निकाली, युवासेनेच्या आंदोलनाला यश; प्रवाशांसाठी ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा सुरू

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील पे अँड पार्किंगच्या मनमानी शुल्कवसुलीविरोधात युवासेनेने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी (माजी) श्री. प्रसाद सुरेश सावंत यांच्या निवेदनाची दखल घेत लेखी आश्वासन दिले आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे रत्नागिरीचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश दा. बापट यांनी पत्राद्वारे पार्किंग व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय कळविला आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात मोफत ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, या कालावधीत पार्किंग शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच मनमानी शुल्कवसुलीच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित पार्किंग ठेकेदारास निर्धारित दरापेक्षा जास्त शुल्क आकारू नये, तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

पार्किंग ठेकेदाराने रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या शुल्काचा दरफलक लावणे बंधनकारक असून, त्याच दरानुसार शुल्क आकारणी करणे आवश्यक आहे. नियमभंग झाल्यास आवश्यक ती देखरेख व कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने युवासेनेने उपस्थित केलेल्या मागण्यांची दखल घेतली गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, पार्किंग ठेकेदाराकडून प्रत्यक्षात जास्त शुल्कवसुली होते का, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *