‘स्टार न्यूज़ कोकण’
संपादक : शब्बीर वस्ता
उपसंपादक : नजीरुद्दीन वस्ता
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पुढाकार! विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी
रत्नागिरी : आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित अजीजा दाऊद नाईक हायस्कूल, रत्नागिरी आणि तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ अंतर्गत दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर दि. १८ व १९ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरात वैद्यकीय क्षेत्रातील चार सदस्यांच्या आरोग्य पथकाने सलग दोन दिवस विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. डॉ. स्वाती संजय पाटील, डॉ. अमित ईश्वर घुले, ए.एन.एम. प्रियांका रहाटे आणि फार्मासिस्ट सिद्धेश पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेत प्रशालेतील तब्बल ९०३ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अत्यंत तळमळीने आणि जबाबदारीने सेवा बजावणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. समीर गडबडे यांनी विशेष कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक श्री. समीर गडबडे आणि सौ. सबिहा कपाडी, विभागप्रमुख – विज्ञान विभाग यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी सलग दोन दिवस मेहनत घेऊन मोलाचे सहकार्य करणाऱ्या संपूर्ण आरोग्य पथकाप्रती प्रशालेने कृतज्ञता व्यक्त केली. अशा आरोग्य तपासणी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वेळेत निदर्शनास येण्यास मदत होते, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीची जाणीव वाढण्यास हातभार लागतो.
या उपक्रमाचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडूनही कौतुक करण्यात आले.


